(Original story written in Konkani by Kiran Mhambre and translated into Marathi)
तिचे हात पाय बांधलेले होते. तोंडावर पट्टी आंवळली होते ती विचार करत होती, हे असं कशामुळं झालं. कशी एकामेकांच्या संगतीनं जीवन कंठत होतो. सगली सुखदुःखं वाटून घेत होतो,रानातले कांटे, जनावरं तर कधी निसर्गाचा कोप सगळ्या आपत्तींना बरोबरीन तोंड देत होतो. निसर्गाचे सोहळे सुध्दा संगतीनं साजरे करत होतो. कां असं बांधून घातलं त्यांनी मला?.. का नाही समजला मला त्यांच्यांत झालेला बदल..?
नाही म्हणायला हल्ली त्याना आपल्या शक्तीचा,आपल्या बाहुबलाचा अभिमान वाटायला लागला होता. अभिमान .. कि अहंकार?.. मला संरक्षण देण्यासाठी सरसावलेले त्यांचे बाहू.. काय गरज होती मला संरक्षण देण्याची.. आपण नव्हतो का करू शकत आपलं संरक्षण?.. साऱ्याच माद्या तरस्वतः बरोबर आपल्या पिलांचं सुध्दा रक्षण करू शकतात, करतात. मग आपल्यातच काय उणीव होती जी त्यांनी भरून काढण्याचे प्रयत्न करावेत?...
की त्यांचा दंभ...मला कमी लेखण्याची धडपड..? भीती तर नाहीना वाटली असेल त्यांना माझ्या अतिरिक्त शक्तींची.... बाहुबलांत त्यांनी ठरवलं म्हणूनच तर नाहीना पडलो आपण मागे...?
किती सुंदर होते ते दिवस! आकाशात वीजा चमकू लागल्याबरोबर पावसाला सुरवात होणार. आपल्याला पाणी मिळणार, झाडांना अंकूर फुटणार, जमिनीतून हिरवी पाती दिसू लागणार हे आपोआप समजत गेलं. एवढंच काय, ते तयार झालेलं बीं रुजवून आपण सुद्धा आपल्याला हव्या त्या पीकाचे उत्पादन करू शकतो याचा साक्षात्कार झाला.
अशा कशा त्यांच्या भूलभुलैयाला फसलो आपण.? . कदाचित हाच फरक असावा माणूस आनी इतर प्राणी यांच्यामधे. अपण जन्म दिलेली आपली बाळे सक्षम झाल्यानंतर नाती निर्माण करून भावनांच्या आहारी नको होतं जायला. हा भावनांचा शापच आपल्या सर्वनाशाला कारणीभूत झाला.
एक एक करून समुदाय तिच्या पुढं नाचत होते. आपली महती सांगण्याचे प्रयत्न करीत होते. इतरांना जगांतील अशांतीला जबाबदार ठरवून आपल्या विचारप्रणालीची बाजू मांडत होते.
कसली विचारप्रणाली आनी कसलं काय! सगळे एकाच माळेचे मणी. प्रत्येकाला आपल्या अधिपत्याची ओढ. काय वाईट होतं ह्या तथाकथीत विचारप्राणालींच्या जन्मा अगोदर...
तिला पूर्वीचे दिवस आठवले. पहिल्यांदां आकाशात वीज चमकून गेलेली पाहिली होती तेव्हा किती घाबरून गेलो होतो आपण.. हे सुध्दा तेवढेच भ्याले होते. गडगडाट झाला तेव्हा तर वाटलं होतं आभाळच कोसळतं. पण आपल्याच आकलनांतून आपल्याला उमगलं, ही पावसाची लक्षणं आहेत म्हणून तेव्हा किती आनंद झाला होता. नंतर तर त्या पावसाचा उपयोग सुध्दा करून घेतला. त्याच्या पासून स्वतःचे रक्षण करण्याचे उपाय सुध्दा शोधून काढले. आनी त्या पर्जन्याचा आनंद उपभोगला.
त्याच वीजेने आपल्याला अग्नीची ओळख दिली. किती उपयुक्त गोष्टी निसर्गानं देऊन ठेवल्यात आपल्याला ह्याची जाणीव होत गेली. निसर्गाची ही अनेक रहस्यं उलगडतांना यांच्या बरोबर आपलाही सहभाग होताच. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहाणे,ऐकणे, त्याचा अर्थ समजून घेणे, त्यांचा परिणाम लक्षात ठेवणे, त्या वरून पुढच्या संभाव्य गोष्टींचा कयास लावणे हे सर्व करतांना आपण यांच्या बरोबरीनआपल्या शक्ती वापरल्या. आपल्याच मदतीने कितीतरी सुविधा प्राप्त करून घेतल्या आहेत यांनी . तरी सुध्दा आपल्याला बांधून घालण्याची दुर्बुध्दी का व्हावी यांना?
एक समुदाय जाऊन दुसरा आपली महती सांगत होता. काय वेगळं सांगत होता? आधीचा समुदाय तर हेच सांगून गेला. जगांत शांती हवी म्हणे यांना. आपले हातपाय सोडवून आपल्याला मोकळं करावं असं कुणाला वाटतच नाही. उलट आणखी कशा प्रकारे बांधता येईल याचीच त्यांना काळजी. काय वाईट केलं होतं आपण यांचं?
जमिनीत पडलेलं बीं पाऊस पडल्यावर उगवून येतं हे आपणच नाही का हेरलं? . त्या नंतर तें बीं पेरून त्यांतून अन्नाचे उत्पादन करण्याची कल्पना आपलीच.एकमेकांच्या संगतीनं किती सुधारणा करून घेतल्या आपल्या जीवनात..किती सुलभ करून घेतलं आपलं जीवन,.. निवऱ्या साठी लागणारी घरं स्वतः बांधू लागलो. हवी असलेली झाडं आजूबाजूला वाढू लागली. त्यासाठी जमीन साफ करण्याचं काम त्यानी आपल्या अंगावर घेतलं असेल.
पण ही झाडं तोडण्यासाठी आनी जनावरांचा मुकाबला करण्या साठी बनवलेली शस्त्रं ते आतां एकामेकां विरुध्द वापरू लागले आहेत.
गाईचं दूध, घोड्याची पाठ, हत्तीची शक्ती सगलं आमच्याच दिमतीला आलं होतं....
तरीसुध्दा.....
तिला काहीतरी खटकत होतं . गाईचं दूध, घोड्याची पाठ वगैरेआपल्या साठी वापरून घेण्याची कल्पना तिची आपली होती का ?. आपल्या फायद्या साठी दुसऱ्यांना वापरून घेण्याची तिची प्रवृत्ती कधीच नव्हती. तिची प्रवृत्ती होती दुसऱ्यांना देण्याची.
आतां पर्यंत दोन चार समुदाय येऊन झाले होते. त्यांचे अनेक दावे होते. पण ते आपल्या बद्दल काय बोलतात याच्या कडे तिचं विशेष लक्ष होतं.
आणि एका परीनं तिचं मनोरंजनच होत होतं. प्रत्येक जण तिच्या विषयी बोलतानां जणू काही ती कुणी तरी दुसऱ्या जातीचा प्राणी असल्या प्रमाणे बोलत होता. सगळ्या प्राण्यात नर आणि मादी असतात हे माहीत असून आपल्याबाबतीत काहीतरी वेगळं असल्या प्रमाणं वागतात. कुणी आपल्याला कधी देवी संबोधतात तर कधी क्षुद्र लेखतात. कुणी गुलाम समजून आपल्याला वापरून घेतात. प्रत्येक समुदायाला वाटतं आपलं त्यांच्या जीवनांत दुय्यम स्थान. फक्त त्यांच्या गरजे पुरतं.
स्वतःला सगल्या प्रणीमात्रात श्रेष्ठ समजायचं आनी आपल्याच मादीला दुय्यम समजायचं. ही त्यांची विचारसरणी. आणि विचारप्रणलीची भाषा करतात. म्हणे जगांत शांती आणायची आहे.
अरे जगातील शांती हरवलीच कशामुळं ?
समुदाय आपल्या शक्ती प्रदर्शनांत दंग होते. स्वतः शिवाय ह्या जगाला पर्याय नाही हेच ठसवण्याची चढाओढ. आनी त्याच बरोबर दुसऱ्याचा बिमोड करून आपलं वर्चस्व प्रस्थापीत करण्याचा खटाटोप. पण तिच्या दोऱ्या सोडवण्याची कुणाची तयारी नाही. की हिंमत नसेल त्यांना ?
आपल्या अंगभूत शक्तींना घाबरले तर नसावेत ते..? म्हणूनच नाहीना आपल्याला बांधून घातलं त्यांनी?..
आपण तरी कसं बांधू दिलं? झोपलो होतो का त्या वेळी? की कसली जादू केली त्यांनी आपल्यावर?
विश्वास ठेवला यांच्यावर हीच मोठी चूक होती. आपल्या रक्ता मांसावर पोसलेला हा जीव आपल्याला प्राणापेक्षा प्रीय होता. त्याला जन्म देतानां मरण यातना सोसल्या तरी त्या कधीच नाकारल्या नाहीत. कारण त्याच्या जन्मात आपलं स्वर्गसूख होतं. त्याला वाढवतांना आपल्याला अतीव आनंद होत होता. त्याच्या प्रगतींत, त्याच्या प्रत्येक विजयात आपल्याला स्वतःचा विजय दिसत होता. म्हणूनच प्रसंगी आपण बाजूला राहून त्याला मार्ग मोकळा करून दिला.
तीच तर चूक नव्हती आपली?
तिला आठवलं. आपल्या भोवतींच्या गोष्टींचं आकलन करून घेतल्या नंतर ते काहीतरी निराळंच बोलू लागले होते. काही तरी अगम्य. ज्याला प्रत्यक्ष असा काही पुरावाच नव्हता. सगळ्या कल्पना. पण त्या कल्पनाच खऱ्या मानण्याचा यांचा आग्रह. त्यांच्याच अनुषंगान वागण्याचा अट्टाहास.
राहू द्या! करू देत त्यांना आपल्या मना प्रमाणे. नाहीतरी त्यांना दुखविण्याचं धाडस आपल्याला कधी झालंच नाही. त्यानी त्याचाच आधार घेऊन आपल्याला दुय्यम ठरवलं हे कळायला आपल्याला युगं लोटली ही आपलीच चूक.
गायीचं दूध, मधमाशांनी जमवलेला मध स्वतःसाठी वापरण्याची त्यांच्या स्वार्थी वृत्तीचा आपणही लाभ घेतला तिथंच आपल्या अधोगतीची सुरवात झाली असावी.
आणखी एक समुदाय समोर नाचू लागला. हात बांधलेल्या अवस्थेत ती त्यांचा नाच बघू सागली. यांच्या नाचांत सुध्दा तेच ध्येय दिसत होतं ते म्हणजे इतरांचा नाश करून आपली तत्वं सगळ्या जगाच्या माथी मारण्याचं.
तिच्या मनांत एक विचार चमकून गेला. ह्यांच्या म्हणण्या प्रमाणं जर सगले समुदाय नष्ट झाले- म्हणजे त्यांच्या विचार प्रणालीही नष्ट होतील—आणि एकच समुदाय शिल्लक राहिला तर हे सुखी होतील का? जगांत शांती नांदेल का?
शिवाय आपल्याला अशा बांधलेल्या अवस्थेत ठेऊन जगांत शांती नांदेल असं म्हणायचं आहे का यांना?
सगळ्या अनिष्ट गोष्टींचं खापर आपल्या माथी मारायची त्यांची संवय. यांच्या कल्पनांना विरोध केल्याचा हा परिणाम. स्वतःच्या कल्पना फोल मानायची यांची तयारी नाही. उलट आपण त्या फोल म्हणण्याचा प्रयत्न केला म्हणून आपल्याला ही शिक्षा.
आता तर तिला रागच यायला लागला होता सगळ्यांचा. तिचाच फायदा घेवून तिचाच वापर करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या क्षुद्र मनोवृत्तींच्या ह्या माणूस म्हणवणाऱ्यांचा तिला राग यायला लागला होता. आपल्या स्वतःच्या विकृतीचे समर्थन करून तिचा बळी बनवून तिच्यावरच आरोप करणाऱ्यांची तिला घृणा यायला लागली होती.
हो मघाशी आलेला विचारच रास्त होता. ह्या सगळ्या समुदायांना नष्ट करून एकालाच ठेवलं पाहिजे. सगळ्या जगांत एकाच समुदायाची विचारसरणी पसरल्यावर तरी हे न भांडता राहू शकतात तर बघायला हवं.
त्यांना ठाऊक नसेल कदाचित. नसेल कशाला?नाहीच. हात पाय बांदले तरी तिची बुध्दी काही ते बांधू शकले नाहीत. उलट हातपाय बांधून ठेवल्या मुळेच कदाचित तिची इच्छाशक्ती तीव्र झाली असेल. त्याच इच्छाशक्तीच्या बळावर तिने आपले हातपाय सोडवून घेतले आनी त्यांना समजलं देखील नाही. त्याच इच्छाशक्तीच्या जोरावर ती आतां त्यांना संपवणार होती आणि त्याचा सुध्दा पत्ता त्यांना लागणार नव्हता.
बहुतेक सारे समुदाय समोरून गेले होते. ती विचार करत होती, यांच्यापैकी कुणाला ठेवायचं? तिच्यासाठी सगळे सारखेच. सगळ्यांच्या बाबतीत तिच्या भावनाही सारख्याच होत्या. कुणाविषयीही तिच्या मनात आदर शिल्लक राहिला नव्हता, कणव नव्हती, आत्मीयता नव्हती.
किंबहुना प्रत्येका विषयी एकप्रकारची घृणाच निर्माण झाली होती.
आतां पक्क ठरलं. कोण कुठला म्हणून न पाहाता समोर आलेल्याला संपवायचे. शेवटचा एक उरे पर्यंत. आणि हो. तो पर्यंत त्यांना कळटां कामा नये आपले हात पाय सुटल्याचे. आपण न केलेल्या चुकीची, अपराधाची शिक्षा देणारे ते, आपले हातपाय सुटल्याचं कळल्यास सगळे एकवटून आपल्यावर हल्ला करतील.
त्यांच्या बाबतीत हे मात्र सामाईक. तिचा विषय निघाला की सगळ्यांची मते एक. एवढी धास्ती घेतली असेल का त्यांनी आपली?
समुदायांची आवर्तनं परत सुरू झाली. पुन्हा एकदा समुदाय तिच्या समोर येऊ लागले. आणि ती आलेल्या समुदायाला आपल्या इच्छा शक्तीच्या जोरावर संपवू लागली. सगले समुदाय संपले. शेवटचा एकच राहिला होता.
सगळे समुदाय संपल्याचं कळल्यावर राहिलेल्या समुदायामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. त्यांनी विजयाचा उत्सव साजरा केला. प्रत्येकानं आपल्या समुदायाच्या विचार प्रणालीच्या गौरवाचं भाषण केलं. अभिमानानं प्रत्येकाची छाती फुलून आली. एक दुसऱ्याला शुभच्छा देऊ लागला. आपल्या तत्व प्रणालीचे गोडवे गाऊ लागला.
शांतपणे ती सगळं निरखीत होती. ही परिस्थिती, हे वातावरण, हा आनंद आणि ही शांती सगळं क्षणभंगूर आसणार या बद्दल तिला तिळमात्र शंका नव्हती. कारण अजून पर्यंत तिला सोडवण्याचं कुणालाच सुचलं नव्हतं. तिच्या पेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजण्याची त्यांची वृत्ती, किंवा आपल्या स्वतः पेक्षा तिला कमी लेखण्याचा त्यांचा हव्यास हाच त्यांच्या हलक्या , कोत्या मनोवृत्तीचं द्योतक होतं. त्या हव्यासामागं न्यूनगंडच असावा का?
काही असलं तरी हे काही निरोगी मनोवृत्तीचं प्रतीक नव्हतं. आणि अशाप्रकारची मनोवृत्ती घेऊन शांती काय प्रस्थापीत करणार हे? यांचा नाश हा ठरलेलाच.
शेवटच्या समुदायातील लोकांचा विजयोत्सव संपत आला होता. आता त्यांची तत्वप्रणाली राबवण्याची वेळ आली होती. प्रत्येक जण आपआपल्या मार्गाला लागला होता. एवढ्यात एकजण दुसऱ्याला ओलांडून पुढं गेला. मागं पडलेल्याला अपमानास्पद वाटलं. त्यानं पुढे गेलेल्याच्या बखोटीला धरून खेचलं आणि त्याच्या मुस्कटात लावून दिली. लगेच समुदायांत गट पडले. काहीजण पुढे जाणाऱ्याच्या बाजूने तर काही मुस्कटात देणाऱ्याच्या बाजूला.
ती विचार करत होती. यांना आत्तांच संपवून टाकायचं का आपला वंश टिकवून ठेवण्या साठी यांच्या भ्रामक तत्वप्रणालीची परंपरा आणि असंवेदनशील मनाची विकृती, आपल्याच जातीच्या एका अंगावर अत्याचार करण्याची वृत्ती टिकवून ठेवायची! की हा शेवटचा समुदायही संपवून आपली प्रजातीच मिटवून टाकायची ...तिच्या समोर धर्मसंकट उभं होतं.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा